कधीतरी आयुष्यात असं कोणीतरी येतं, की आपल्याला ती व्यक्ती परकी नव्हतीच कधी असं भासते.
अमोल कचरे हा असाच एका आडवाटेवर भेटलेला सच्चा माणूस, नंतर तो कधी मित्र आणि काळाच्या ओघात मोठा भाऊ झाला कळले ही नाही. लिखाण, डोंगरातल्या वाटा आणि खवय्येगिरी यात आम्हांदोघांचा रस, त्यामुळेच मुंबई-पुणे अंतर असून ही दोघांत फारसे अंतर नव्हते.
आमची पहिली भेट ही गडावरची “राजमाची”, २०१३च्या पावसाळ्यात त्याचा शाळकरी मित्र आणि माझा कंपनीमधला मित्र सागर, हा आमच्या मैत्रीतला दुवा ठरला. तिथून या मैत्रीचा प्रवास सुरु झाला. आधी आदराने सर म्हणून हाक मारली, तर तो हसला , दादा बोललो तर म्हणाला मला वय झालाच्या फिल नको देऊ. अमोलच हाक मार.
मी उच्चशिक्षणासाठी पुण्यात आलो तेव्हा त्याच्यासोबत पुणे फिरलो, युनिव्हर्सिटी मध्ये असलेल्या घरी राहीलो. त्याने कधीही परकेपणा दाखवला नाही. माझे छोटेखानी ब्लॉगवर लिहणं त्याच्या प्रोत्साहनामुळे वर्तमानपत्रात छापून आले आणि येत राहीले. प्रभातचे कॉलेज कनेक्ट असो किंवा सकाळच्या रत्नागिरी पुरवणीचा वर्धापनदिनानिमित्त आम्ही दोघांनी लिहिलेला लेख, तो कायम प्रोत्साहन देत असे. काही नविन लिहीले का? असेल तर दे वाचायला, नाहीतर हा विषय आहे यावर लिह आणि दे असं हक्काने सांगायचा.
कोणत्या ही फेस्टिवलमध्ये जायला आम्ही दोघे तयार... काळाघोडा आर्ट फेस्टिवल असो किंवा मुंबई फिल्म फेस्टिवल... नविन लोक, नविन गोष्टी आणि नविन तंत्रज्ञान हे त्याचं बौद्धिक खाद्यच जणू...
तो जिथे जात असे तिथे नविनमाणसे जोडून येत, आपल्या घरातले आपले कमी आणि त्याच्या बाजूने जास्त बोलायचे इतका तो माणसांना जिंकुन घेण्यात तरबेज. कधी मराठवाडा दौरा, कधी गोव्या मध्ये इफ्फी तर कधी नोकरी निमित्त या ना त्या शहरात तो असायचा. आम्ही जमेल तेव्हा जमेल तसे नेहमी क्षणभर का होईना वाटेत थांबून भेटायचो. कोल्हापूरचे रेडीओ सिटी असो वा मंत्रालय तो आपुलकीने स्वागत करायचा आणि प्रवासातला ताण विरघळून जायचा.
पण म्हणतात ना जो आवडे सगळ्यांना तोचि आवडे ईश्वरा, तसेच काळाने घात केला आणि अमोल तू सर्वांना मागे टाकून निघून गेलास. तुझ्या जाण्याने एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.
तू नेहमीच माझ्यासाठी प्रोत्साहन राहशील. दोन दिवस आधी फोनवर आपले बोलणे झाले होते, तेव्हा तू ऑपरेशनची पुसटशी कल्पना ही दिली नव्हतीस, पण आपण पुढच्या महिन्यात भेटायचे , गंधर्वचा वाढदिवस साजरा करायचा हे सगळं नियोजन करत होतो पण नियतीने मात्र काही वेगळंच योजले होते.
- प्रशांत खोत

~स्पर्श~
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुम्ही दिलेल्या अभिप्रायालाबद्दल आभारी आहे.
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.