रेल्वेत चढायला मिळणं आणि गंतव्य स्थानी पोहचणे महत्वाचे होते. अशातच चुकून कधी मिळाली बसायला जागा तरी ती खिडकी असेलच असं नसतं.
अचानक कधी एके दिवशी ऑफिस मधून उशिरा निघालाय तुम्ही, रेल्वेत चढायला मिळालं आणि खिडकपाशी जागा ही...
वाऱ्याची चेहऱ्यावर येणारी झुळूक, कानात संगीताचे सुर आणि गाण्यातला एक एक शब्द तुमच्या काळजाला भिडला की दिवसभराचा थकवा कुठल्याकुठे निघून जातो.
मला आठवतं पुणे मुंबई प्रवास करताना इंटरसिटीची जनरल क्लासमधली खिडकीजवळची जागा नेहमी पकडुन संध्याकाळचा सूर्यास्त, मंद हवा , गाणी,आणि कधी कधी पावसाच्या सरी असं अनुभवायची जणू सवय झाली होती,बाजूच्या दोन सीट वर कोण आलं कोण गेलं याचं काही सोयरसुतक नसे मला, पण निसर्गाची बाहेर चाललेली एक एक करामत पाहत दिवसभराचा थकवा निघून जाई.
आज बऱ्याच दिवसांनी कामाच्या व्यापातून स्वतःसाठी असे दोन क्षण काढता आले, रात्रीची वेळ, मुंबईची लोकल रेल्वेमध्ये गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली होती, खिडकीजवळ जाऊन बसलो. बसता क्षणी काही वाटले नाही, पण प्रवास जसा सुरू झाला आणि खिडकीबाहेरच्या निसर्गासोबत हितगुज सुरू झाले, तेव्हा कितीतरी दिवसाचे मनावर असलेलं मळभ क्षणात दूर झालं आणि नवी उमेद निर्माण झाली.
वय वाढलं तरी काही गोष्टी बदलत नाहीत, त्या तितक्याच मनाच्या जवळ असतात आणि मनाला ही त्यांच्यामुळे नवीन उभारी येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुम्ही दिलेल्या अभिप्रायालाबद्दल आभारी आहे.
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.